समांतर क्रांती / कारगिल विजय दिवस विशेष
खानापूर: हा तालुका मुळातच शौर्याची गाथा सांगणारा आहे. येथील अनेकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. अलिकडे स्वातंत्र्योत्तर काळातही येथील अनेकांनी सैन्यदलात सेवा बजावतांना देशासाठी बलिदान दिले आहे. आज कारगिल विजय दिन. यानिमित्ताने अशाच एका धिरोदात्त वीर सैनिकाची शौर्यगाथा मांडत आहोत..
..आणि त्यांनी २२ गोळ्या अंगावर झेलल्या.
दिवस होता २० डिसेंबर १९९३ चा. नागालँडच्या दुर्गम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. एका कर्नलासह अनेक २५-३० जवानांची तुकडी दहशतवद्यांच्या शोधासाठी निघाली. सगळीकडे शोधाशोध करूनही दहशतवाद्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे हताश होऊन निघालेल्या सैन्याच्या फलटणीवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यात कर्नलसह १६ जवानांना वीरमरण आले. अनेकजण जखमी झाले त्या जखमीमध्ये खानापूर तालुक्यातील हलशीवाडीचे जवान यशवंत गणपतराव देसाई यांचाही समावेश होता. त्यात त्यांनी अंगावर तब्बल २२ गोळ्या झेलल्या होत्या. केवळ सुदैवाने ते त्या हल्ल्यातून बचावले. निवृत्तीनंतर ते त्यांच्या गावी हलशीवाडीत राहतात. शेतीचे काम जमत नाही, पण तरूणांना देशासाठी लढण्याची उर्जा देतात.
ऑक्टोबर १९८३ मध्ये ते मराठा लाईट एन्फट्रीमधून सैन्यदलात दाखल झाले. देशासाठी कांही तरी करावे या वेड्या ध्येयाने ते रूजू झाले. पण, त्यांना शत्रूशी दोन हात करण्याची संधी कधी मिळाली नव्हती. २० डिसेंबर १९९३ रोजी नागालँडमध्ये दहशतवादी असल्याचा सुगावा त्यांच्या प्लाटूनला लागला. त्यांच्या प्लाटूनने तात्काळ शोधमोहिम हाती घेतली. संपूर्ण परिसर शोधूनही दहशतवादी मिळाले नाहीत, ही खंत उरावर घेऊन परत जातांना बेसवावध जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात कित्येकांना वीरमरण आले. त्यात यशवंतरावांनी तब्बल २२ गोळ्या आपल्या अंगावर झेलल्या. या घटनेनंतर ते सुमारे वर्षभर लष्कराच्या इस्पितळात होते.
केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर यशवंतराव बरे झाले. पण, त्यांनी त्यावेळी घरी परतण्याऐवजी देशसेवेचा निर्णय घेत सैन्यात राहिले. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. स्वत:च्या अंगावर २२ गोळ्या झेलणाऱ्या या शूर जवानाला साधे मेडलही मिळाले नाही. त्याची त्यांना अजिबात खंत वाटत नाही. त्यांनी आपल्या अंगावर गोळ्या झेलतांना कांही सहकारी जवानांचे प्राण वाचविल्याचा अभिमान मात्र त्यांना निश्चितच आहे. देशसेवा म्हणजे लुटुपुटूची लढाई नाही, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वातून स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या कर्तबगारीचा म्हणावा तसा मानसन्मान झाला नाही तरी ते निराश झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या मुलाला शिवराज याला सैन्यदलात दाखल केले आहे. त्यांची मुलगीही उच्चशिक्षीत आहे.
हाताला आणि पायांना गोळ्या लागल्या त्यामुळे शेतकाम वगैरे जमत नाही, असे त्यांनी सांगितले. हल्ल्याची थोडी जरी कल्पना असती तर दहशतवाद्यांना आडवे केले असते, ती संधी हुकली याची खंत वाटते. पण, देशसेवेची आस अजूनही आहे. ती कायम राहील, असे त्यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना सांगितले.उपेक्षित राहिलेल्या या वीर जवानाच्या कर्तृत्वाला ‘समांतर क्रांती’चा सलाम..!
(काही तांत्रिक अडचणींमुळे दोन दिवस ‘समांतर क्रांती’ वेबपोर्टल अंशत: बंद होते. त्यामुळे बुधवारी प्रसिध्द होणारी ही स्टोरी आज गुरूवारी प्रसिध्द केली आहे.धन्यवाद)
One thought on “देशासाठी खानापूरच्या ‘या’ सुपुत्राने २२ गोळ्या अंगावर झेलल्या होत्या!”