रामनगर: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा रामनगर (ता.जोयडा) पांढरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी घडली. मुबारक मेहबूब पठाण (वय ११, रा.हुबळी) व अफान अफताब खान (वय १२, चर्च गल्ली-रामनगर) अशी मयत बालकांची नावे आहेत. ते अन्य तिघा मित्रांसमवेत पोहायला नांद्रेकर पुलाजवळ गेले होते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दिवसभर उष्णतेने अंगाची लाही झाल्याने गारवा मिळावा म्हणून मुबारक आणि अफान हे पांढरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. सोबत अन्य तीन मित्र होते. ते पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले, त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक शिवानंद, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर हरिहर, रामनगरचे उपनिरीक्षक एन.एम.बसवराज यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पांढरी नदीत ठिकठिकाणी पाणी आहे. ते आटत असल्याने गाळात अडकून त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. मृतापैकी मुबारक हा अफताफ खान यांच्याकडे सुट्टीनिमित्त आला होता. पण, त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. स्थानिकांच्या सहायाने उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. रामनगर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
One thought on “पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पांढरी नदीत बुडून मृत्यू”