सातनाळी मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात
पायाभूत सुविधांपासून वंचित असूनही सातनाळी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश केवळ कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद आहे. येथील अनेक पिढ्यांना घडविण्याच्या कार्यात या गावच्या सरकारी मराठी शाळेने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. संकटांना संधी मानून परिस्थितीशी केलेला संघर्ष मानवाला यशस्वी बनवितो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सातनाळी गावाकडे पहावे लागेल. असे प्रतिपादन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले. ते सातनाळी (ता. खानापूर) सरकारी मराठी प्राथमिक शाळेचा सुवर्ण महोत्सव सोहळा व माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी पुंडलिक दळवी होते.ते पुढे म्हणाले, आजही सातनाळी येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी साकवावरून प्रवास करावा लागतो. गावापर्यंत बस येत नसली तरी लोंढ्या पर्यंत पायी प्रवास करून या गावचे विद्यार्थी आपले भविष्य घडवत आहेत. ही जिद्द आणि चिकाटी नवी यशोगाथा लिहिल्याशिवाय राहणार नाही. आजच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शाळेविषयी आणि येथील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या गावाने माणुसकी आणि संस्कार जपले आहेत.प्रारंभी नितेश मिराशी, नमिता मिराशी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेची माजी शिक्षक बी. एम. पाटील, सुनील कुंभार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग नाईक, सीआरपी सुनील शेरेकर, बी. ए. देसाई, प्रशांत वंदुरे-पाटील, एफ. आय. मुल्ला आदी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक डी. एस. खोत यांनी केले. रामचंद्र गावकर यांनी आभार मानले. एस. एस. परब यांनी सूत्रसंचालन केले.