समांतर क्रांती वृत्त
खानापूर: शिकार करायला गेले आणि स्वत:हून जाळ्यात अडकले,अशी घटना बुधवारी रात्री बरगावजवळ घडली. गर्लगुंजीला जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या साई मंदिरात चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाच शिवाय ते आयतेच पोलिसांच्या तावडीत सापडले.
त्याचे असे झाले; रात्री उशिरा तिघांनी साई मंदिराचे शटर तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिराशेजारी उद्योजक के.पी.पाटील त्यांच्या वाहनात झोपले होते. ते आवाजाने जागे झाले. मंदिरात चाललेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तेथे जाऊन चोरांना हटकले असता, त्यातील दोघांनी पोबारा केला. तर प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय २१, रा. बरगाव) याला त्यांनी पकडून ठेवले. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन त्यास ताब्यात घेतले. फरार झालेल्यांची नावे पोलिसांना समजली असून त्यांचाही शोध सुरू आहे.
श्री. पाटील हे बांधकाम साहित्य येणार असल्याने वाट पाहत त्यांच्या वाहनात झोपले होते. त्यामुळे ही चोरीची घटना टळली. गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनांमुळे नागरीकात घबराट पसरली आहे. त्यात मंदिरातील चोरीत जवळच्या गावातीलच तरूण आढळले. मात्र ते सराईत चोरटे नसून केवळ मौजमजेसाठी त्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. तरीही त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शेतमजुरांच्या कमतरतेवर ‘ड्रोन’चा दिलासा
समांतर क्रांती वृत्त / प्रसन्न कुलकर्णी खानापूर : शेतमजुरांची कमतरता ही सध्याची मोठी समस्या बनत चालली आहे. शेतीत खत आणि औषधांचे शिंपण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असतांना आता त्यावर उपाय सापडला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शिवारात औषध फवारणीसारखी कामे करणे सोपे बनले आहे. तालुक्यातील गंदीगवाड प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेच्या चालकांनी गंदीगवाड व आजूबाजूच्या […]