चेतन लक्केबैलकर / स्पेशल रिपोर्ताज
What is going on at that illegal resort? आमटे येथील एका विनापरवाना रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडाल्याने महांतेश अशोक गुंजीकर (वय २७, खासाबाग-बेळगाव) या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२९) घडली. या घटनेनंतर तालुक्यातील अशा विनापरवाना अवैध रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या रिसॉर्टमध्ये अनेक अवैध प्रकार चालत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतरही संबंधीत ग्राम पंचायत किंवा पोलिस खात्याकडून अवैध रिसॉर्ट मालक-चालकांवर कारवाई होत नसल्याने संबंधीत अधिकाऱ्यांचे त्यांच्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचे स्पष्ट होते. आमटेतील घटनेनंतर खानापूर काँग्रेसने या रिसॉर्टबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
खानापूर तालुक्याचा स्वर्णिम पश्चिम भागातील अनेक गावांच्या हद्दीत रिसॉर्ट आणि फार्महाऊस आहेत. बेळगावसह राज्यातील अनेक धनदांडग्यांनी या भागात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध प्रकार चालतात. ज्या आमटे येथे रविवारी दुर्घटना घडली. त्या परिसरात तीन अवैध आणि विनापरवाना फार्महाऊस आहेत. त्यात रिसॉर्ट चालविली जातात. बेळगावमधून येणारे पर्यटक त्यांचे गिऱ्हाईक असते, अशी माहिती एका स्थानिकांने ‘समांतर क्रांती’शी बोलतांना दिली.
जांबोटीपासून चोर्लापर्यंत अनेक विनापरवाना अस्थापने आहेत. त्यांचा फार्महाऊस, हॉटेल आणि रिसॉर्ट म्हणून वापर केला जातो. या अस्थापनांचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. चिखलेजवळील एका रिसॉर्टचा वापर प्रसिध्द विवेकवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट शिजविण्यासाठी करण्यात आला होता. त्या हत्याप्रकरणात भरत कुरणे याला अटक करण्यात आली. शिवाय ते प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच त्याचे ते अवैध रिसॉर्ट जमिनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतरही स्थानिक पंचायतींनी अशा अवैध अस्थापनांकडे लक्ष दिलेल्या नाही.
या रिसॉर्टमध्ये काय चालते?
जांबोटी भागातील अवैध रिसॉर्टमध्ये अनेक काळे कारनामे चालत असल्याची कुजबूज स्थानिक नागरीकांत आहे. तेथे रम, रमा आणि रमीचे डाव खेळले जातात. दारू आणि मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणात रेलचेल या रिसॉर्टमध्ये चालते. त्यात अलिकडे स्थानिक तरूणदेखील गुंतत चालले आहेत.तेथे रेव्ह पार्टी सुध्दा चालतात. त्यात कॉलेजच्या तरूण – तरूणींचा सहभाग असतो. शिवाय बेळगावहून महिला आणि तरूणींना आणून येथे वेश्या व्यवसाय चालविले जात असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच जुगार आणि मटक्यांचे डावही तेथे रंगतात. त्यातूनच खून आणि मारामारी घटना घडत असून यामुळे पश्चिम घाटात दहशतीचे वातावरण आहे. सदर रिसॉर्टमधून जंगल भागातून वन्य प्राणी आणि दुर्मिळ वनौषधींची तस्करी सुध्दा मोठ्या प्रमाणात होत आहे. या सगळया प्रकारांना त्या परिसरातील गावगन्ना पुढाऱ्यांचा वरदहस्त लाभल्याने हे प्रकार वाढीस लागले आहे.
वन आणि पोलिस खात्याचे दुर्लक्ष का?
खानापूर तालुक्याचा बहुतेक जंगल भाग हा आरक्षित आहे. त्यातही जांबोटी ते चोर्ला घाटापर्यंतचा परिसर हा हरित पट्टा म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरात रिसॉर्टसारखे उद्योग सुरू करण्यासाठी रितसर परवान्याची गरज आहे. तरीही जंगलावर अतिक्रमन करून हे धंदे बिनबोभाट चालले आहेत. वनखात्याला मात्र या प्रकारांशी कांहीच देणे-घेणे नाही. त्याउलट स्थानिकांची पिळवणूक करण्यात वनाधिकाऱ्यांना धन्यता वाटते.
पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांचे ‘हात ओले आणि खिसे गरम’ होत असल्याने त्यांच्याकडून रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या ‘धंद्या’वर कारवाई होणे अशक्यच आहे. ग्राम पंचायतींना सुध्दा नियमीत हप्ते पोहचत असल्याने विकास अधिकारी (पीडीओ) हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत.
एकाही अशा रिसॉर्ट मालकांने पंचायतीकडून रितसर परवानगी घेतलेली नाही. पंचायतीच्या परवानगीशिवाय हेस्कॉम वीज जोडणी देऊ शकत नाही. असा नियम असला तरी हेस्कॉम सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवत आहे. सगळेच आम्ही सगळे भाऊ-भाऊ, मिळेल ते वाटून खाऊ असे म्हणत खुशाल असल्याने हे धंदे विनासायास चालले आहेत. एकंदरच, जांबोटी भागातील फार्महाऊस आणि रिसॉर्ट हे गुन्हेगारांसाठी ‘दगडी चाळ’ बनले आहेत. त्याचा विपरीत परिणाम या भागातील ससंस्कृतीवर होत आहे. त्यासाठी अशा प्रकारांविरोधात स्थानिकांतून आवाज उठण्याची गरज आहे.
वर्षाच्या शेवटी खानापूर परिसरात आगीच्या दोन घटना
समांतर क्रांती / खानापूर २०२४ हे वर्ष सरत असतांना खानापूर परिसरातील रुमेवाडी क्रॉस येथे काजूच्या फॅक्टरीला तर मारूती नगरच्या शिवारात गवत गंजीना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याच्या घटना बुधवारी (ता.३१) घडल्या. रुमेवाडी क्रॉस येथील सुरेश शिवणगेकर यांच्या काजूच्या कारखान्याला बुधवारी उत्तररात्री अचानक आग लागली. यावेळी कारखान्यात सुमारे ३० टन तयार काजू होता, असे शिवणगेकरांचे म्हणणे […]