महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का?
विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर
पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी बाब आहे. यावरूनच उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रीयेचा प्रत्यय येतो.
लोकांना मतदान करण्यासाठी होडीने मतदान केंद्रापर्यंत पोहचावे लागते. एका गावातून चालत जाऊन दुसऱ्या गावात मतदान करावे लागते. एकंदर, त्यांचा हक्कदेखील त्यांना सहजासहजी बजावता येत नाही. अशा स्थितीत या मतदार संघातील मतदनाची टक्केवारी नेहमीच निच्चाकी राहिली होती. यावेळी मात्र ती ७६ टक्क्यांवर पोहचली. हे का घडले? याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न..
२००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर कन्नडमधून केवळ ५९.०९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या २०१९ च्या निवडणुकीत ६९.०१ टक्के तर २०१९ च्या निवडणुकीत ७४.१६ टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र तब्बल ७६.५२ टक्के मतदान झाले. मतदारांत ही उर्जा अचानक कशी संचारली? हा निवडणूक आयोगालादेखील पडलेला प्रश्न आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील एकुण राजकीय चित्र यावेळी बदलले आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
१९९६ च्या दरम्यान हुबळीतील इदगाह मैदानाच्या वादातून दंगल भडकली, त्याचा फायदा उठवत अनंतकुमार हेगडे खासदार झाले. त्यानंतर १९९९ मध्ये मार्गारेट अल्वा यांनी बाजी मारत काँग्रेसला पुन्हा गड मिळवून दिला. त्यानंतर मात्र तब्बल २८ वर्षे १ लाख ६० हजार लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समाजाच्या हातात उत्तर कन्नडची सत्ता कायम राहिली. अनंतकुमार हगडे यांनी या भागातील आठ विधानसभा मतदार संघावर त्यांची मांड कायम ठेवतांना विकासाच्या मुद्याला केराची टोपली दाखविली. कोणताच प्रश्न तेथील राजकारण्यांनी गांभिर्याने घेतला नाही. धर्म आणि जात हेच प्रत्येक निवडणुकीतील मुद्दे राहिले. साहजिकच यावेळी मतदारांना बदल आपेक्षीत होता.
डॉ. चितरंजन आणि आमदार अशोक अस्नोटीकरांच्या हत्येनंतर पसरलेले भय कायम असल्याने काँग्रेसनेही अनंतकुमार हेगडे यांना मात देईल, असा उमेदवार देण्याचा प्रयत्न गेल्या २८ वर्षात केला नाही. सध्याचे प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे यांचे सुपुत्र प्रशांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, तरीही योग्य नियोजनाअभावी काँग्रेसला हार पत्करावी लागली होती.
अनंतकुमार हेगडे यांच्याबद्दल असलेला प्रचंड रोष आणि जनक्षोभ लक्षात घेत यावेळी काँग्रेसने संधी साधली. २ लाख २० हजार मराठा, ३ लाख अल्पसंख्यांक आणि २ लाख इडिगा (नामधारी) तसेच जवळपास २ लाख अनुसुचीत जाती-जमाती व आदीवासी मतदारांना ‘कॅश’ करीत निवडणूक जिंकण्याचा चंग बांधत माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी घोषीत केली. डॉ. निंबाळकर यादेखील मतदार संघातील समस्या आणि मतदारांची मानसिकता यांचा अभ्यास करून मतदार संघात उतरल्या. कारवार जिल्ह्यातील सर्वात मोठी मागणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही आहे, त्या मागणीला हूल देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी बदल घडवा, हॉस्पिटल देऊ, अशी घोषणा केली. साहजिकच त्याचा परिणाम मतदानावर झाला. अतिक्रमीत जमिनी, मच्छीमारांचे प्रश्न अशा मागे पडलेल्या मुद्यांना हात घातल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मतदारांत उत्साह संचारला नसता तरच नवल!
काय होतं बुथवरील वातावरण?
मागील चार निवडणुकात बहुतेक भागात काँग्रेसचा ‘टेबल’देखील लागला नव्हता. अर्थातच त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्नसुध्दा झाले नव्हते. पण, यावेळी बदलाची नांदी विधानसभेच्या निवडणुकातूनच झाली होती. त्यामुळेच आठपैकी पाच मतदार संघात काँग्रेसने बाजी मारली. त्याचाही फायदा या निवडणकीत झाला. एकतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला होताच; त्याशिवाय अनंतकुमार हेगडे यांच्या पराकोटीच्या निष्क्रीयतेमुळे भाजपबद्दल प्रचंड नाराजीचा सूर होता. तो यावेळी काँग्रेसने ‘कॅश’ केला. तसेच ज्यांच्यातून कधीच विस्तवही जात नव्हता, ते आमदार आर.व्ही.देशपांडे आणि माजी खासदार मार्गारेट अल्वा हे एकत्र आल्याने ‘भय’ संपले.
आतापर्यंत उत्तर कन्नडमध्ये केवळ जातीपातींचे राजकारण झाले. देवराय नाईक, व्ही.बी.नाईक, ख्रिश्चन समाजातील मार्गारेट अल्वा आणि मराठा समाजातील बी.पी.कदम वगळता सतत ब्राम्हण समाजाचे वर्चस्व राहिले. आपल्या समाजाला प्रस्तापितांकडून संधीच मिळत नाही, ही भावना निर्माण झाल्याने इडीगा, मराठा, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक मतदार बिथरले होते. ते यावेळी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले. विशेष म्हणजे काँग्रेसबरोबर कधीच नसलेला लिंगायत समाजदेखील यावेळी फिरला. या समाजाची सुमारे एक लाख मते आहेत.
तरूण काँग्रेससोबत का गेला?
देशभरातील तरूण मतदार हा यावेळीदेखील भाजपसोबत राहीला. उत्तर कन्नड याला अपवाद ठरला. यावेळी बदल व्हायलाच हवा, यासह आम्हाला नोकऱ्या हव्यात, असे म्हणत तरूणाई काँग्रेससमवेत राहीली. कारवार, मंदगोड आणि अंकोला येथील रोड शो दरम्यान त्याची झलक पहावयास मिळाली. काँग्रेसने विधानसभा निवडणुकांत दिलेले पाच गॅरंटीचे आश्वासन आवघ्या महिन्यात पूर्ण केल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजुने कलला.
१६ लाख ४१ हजार १६० मतदारांपैकी ८ लाख १७ हजार ५३६ महिला मतदार आहेत, त्यापैकी ६ लाख २२ हजार २१२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ६ लाख ३३ हजार ४८५ पुरूषांनी मतदान केले. एकंदर, यावेळी महिलांचा टक्का वाढला आहे. हा टक्का वाढण्यास राज्य सरकारच्या गॅरंटी योजना कारणीभूत आहेतच, शिवाय महिला उमेदवार म्हणून डॉ. अंजली निंबाळकर यांना मिळालेली सहाणुभूती यामुळे देखील ही टक्केवारी वधारली. त्याचा एकुण फायदा काँग्रेसलाच होणार आहे, असे राजकीय तज्ज्ञ म्हणतात.
कित्तूर, हल्याळ, कारवार, भटकळ आणि शिरसी या मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. यावेळी यापैकी कुणीही बंड करण्याचा प्रयत्न केला नाही, हे विशेष. पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्यासह आर.व्ही.देशपांडे आणि सतिश सैल यांनी कारवारमध्येच तळ ठोकला होता. यल्लापूरचे भाजप आमदार शिवराम हेब्बार यांचा मुलगा विवेक हेब्बार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह अगदी सुरूवातीलाच काँग्रेसचा हात धरला. शिवराम हेब्बार यांनी भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारापासून फारकत घेतली. ते मोदींच्या जाहीर सभेलादेखील उपस्थित राहिले नाहीत. आठपैकी सहा मतदार संघात विनासायास काँग्रेसचे बळ वाढले.
भाजपचा पाय खोलातच!
खासदार अनंतकुमार हेगडे यांना नारळ देण्यात आल्यानंतर त्यांनी प्रचारापासून स्वत:ला लांब ठेवले. त्याचे आणखी कारण म्हणजे कागेरी आणि हेगडे यांच्यातील पारंपारीक शत्रुत्व. आधीच विधानसभा निवडणुकीत हातातून सुटलेला शिरसी मतदार संघ काँग्रेससाठी ‘रामबाण’ ठरला. कारवारमध्ये आमदार सैल यांनी आघडी घेण्यात कोणतीच कसर सोडली नाही. भटकळ हा अल्पसंख्यांचा मतदार संघ. तेथून सर्वाधिक मताधिक्य काँग्रेसला मिळेल. हेब्बार यांच्या यल्लापूर मतदार संघातूनदेखील काँग्रेसला चांगल्या मतसंख्येची गॅरंटी आहे. कित्तूरमध्ये दोन्ही पक्षात काटें की टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुमठ्यातून मात्र काँग्रेसला सेटबॅक असेल, यात शंका नाही. भाजप या मतदार संघात आघाडीवर असेल. खानापूर मतदार संघातही काँग्रेसला आपेक्षित मतदान होणार नाही. स्थानिक उमेदवार असतांनाही शहर आणि मोठ्या गावांत भाजप आघाडी घेऊ शकते. पश्चिम भागातील कांही गावे वगळता सर्रास भाजपला मतदान झाले आहे. तीच स्थिती पूर्व भागातीलही आहे. स्थानिक आमदार भाजपचे असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातून यापूर्वी भाजपला झालेल्या मतदानात मात्र घट होणार हे नक्की. बहुतांश गावातून म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई यांना मतदान झाले आहे.
मोदी लाट कुठे आहे?
यावेळच्या निवडणुकीत एक झाले. उत्तर कन्नडमध्ये कुठेच मोदी लाट पाहायला मिळाली नाही. त्याउलट मोदींच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह उभे राहीले. सभा आणि सोशल मिडियातदेखील भाजपचा म्हणावा तसा बोलबाला नव्हता. एकंदर कागेरी यांनी निकालापूर्वीच हार पत्करल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. तरीही उत्तर कन्नड हा मतदार संघ कोकणपट्ट्यात येत असल्याने ‘देवाच्या नावाने चांगभलं’ झाल्याचा अंदाजदेखील राजकीय विश्लेषक व्यक्त करतांना दिसतात. काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार की भाजपला ‘अंदण’ देणार हे ४ जूनलाच समजणार आहे. तोपर्यंत चर्चांचे गुऱ्हाळ सुरू असेल.
चोर्ला घाटात अपघात; तब्बल चार तास वाहतूक कोंडी
जांबोटी: चोर्ला महामार्गावर बसला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेंपो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. १०) घडली. यामुळे या मार्गावर तब्बल चार तास वाहयूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजुला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कदंबा बस पणजीहून बेळगावकडे तर टेंपो बेळगावहून पणजीकडे निघाला होता. […]