
समांतर क्रांती / खानापूर
गेल्या दोन महिन्यापासून खानापूर-अनमोड मार्ग बंद करण्यात आला आहे. आजपासून (ता.२२ मार्च) हा रस्ता वाहतुकीस खुला केला जाणार होता, पण कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे पुढील महिनाभर तरी हा रस्ता वाहतुकीस बंदच राहणार असल्याचा अंदाज आहे. खासदारांच्या दुर्लक्षामुळेच कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप यादरम्यान काँग्रेसचे या भागातील नेते ईश्वर बोबाटे यांनी केला आहे.
रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी सहा महिने मणतुर्गाजवळील या भुयारी पुलाच्या कामासाठी अनेक महिने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून या ना त्या कारणाने वाहतुकीला आढथळा केला जात आहे.
वाहतूक असोगा-मणतुर्गा मार्गे वळविण्यात आली आहे. एकतर असोगा मार्गाची दूरवस्था झाली आहे. त्यात गोव्याला जाणारी वाहतूक असोगा आणि मणतुर्गा गावातून होत असल्याने धुळीने नागरीक त्रस्त आहेतच; शिवाय गावातील लहान मुलांच्या जिवीतासही धोका निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही खासदारांकडून दखल घेऊन कंत्राटदाराला कानपिचक्या दिल्या जात नसल्याचा हा परिपाक असल्याचा आरोप होत आहे. खानापूर – अनमोड या महत्वाच्या मार्गावरील वाहतूक वारंवार बंद केला जात असल्याने या भागातील व्यवहार थंडावले आहेत.
भुयारी पुलाचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतुकीस मार्ग खुला करण्याची मागणी मणतुर्गा – शिरोली भागातील नागरीकांतून होत आहे.
अलिकडेच आमच्या प्रयत्नातून रुमेवाडी फाटा ते पुढील नादुरूस्त मार्गाचे डांबरीकरण झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला चांगले दिवस आले होते. या भागातील प्रवाशांचा वनवास संपला असे वाटत असतांनाच रेल्वेकडून वारंवार वाहतूक बंद केली जात आहे. खासदारांकडून लक्ष दिले जात नसल्यानेच गेल्या दीड वर्षांपासून ही स्थिती आहे.
- ईश्वर बोबाटे, काँग्रेस नेते-मणतुर्गा

निधन: भीमराव अमृत पाटील
नंदगड: हत्तरवाड (ता.खानापूर) येथील रहिवासी भीमराव अमृत पाटील (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.२४ रोजी होणार आहे