समांतर क्रांती / युवा दिन विशेष
- १२ जानेवारी हा स्वामीविवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आगामीशतक भारताचे असेलआणि देशाचे भवितव्य युवाशक्तीवर अवलंबून आहे. हेस्वामीजींनी सव्वाशे वर्षापूर्वीसांगितले होते. युवा पिढीला संस्कारीत करण्याबरोबरच देशभक्तीचे बाळकडू आपल्या विचारातून तसेच साहित्यातून त्यांनी मांडले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वामीजींचे विचार प्रेरणास्त्रोत ठरले. आध्यात्माबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करा, तसेच बळकट शरीरासाठी फुटबॉल खेळा असा संदेश त्यांनी युवकांना दिला आहे
‘गिव्ह मी हंड्रेड युथ, आय वील चेंज द व्होल वर्ल्ड इन टू हेव्हन’ हे वाक्य वाचलं की हमखास डोळ्यासमोर येतात ते स्वामी विवेकानंद.पोरसवदा वयात अपार बुध्दीमत्ता बाणवलेले स्वामी विवेकानंद याच देशात होऊन गेले का? असा प्रश्नही सध्याच्या वर्तमानात विचारवंताकडून विचारला जातो. त्याबरोबर देशाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तरूणांचा देश म्हणून भारताची गणना होत असतांना देशातली तरूणाई कोणत्या मार्गाने चालली आहे? पाश्चिमात्य संस्कृतीच्या जोखडात अडकून ही तरूणाई आपली संस्कृती आणि देशाभिमान तरी विसरत चालली नाही ना? तरूणाई असंवेदनशील बनली आहे का? असे किती तरी प्रश्न आज उपस्थित होताहेत. घरचं राहुद्या, पण देशाचा तरी अभिमान तरूणांना असायलाच हवा, असा अट्टाहास हल्ली धरला जातो आहे. तो किती योग्य आणि किती अयोग्य आहे, याच्याशी या तरूणाईला कांहीच देणं- घेणं नाही. तरीही ही तरूणाई म्हणतेय, यस्स, वुई कॅन..!
टाईमपास चित्रपटातल्या दगडुची कॉपी करणारी तरूणाई देशावरही तितकच प्रेम करते, दुनियादारीतल्या दिग्यासाखं प्रियसीवर झुरणारी तरूणाई देश आणि समाजाच्या समस्यांबाबतही तितकीच गंभीर आहे. तरूणाई प्रयोगशिलही आहे. तरूणाईवर केल्या जाणाऱ्या सर्वच आरोपात तथ्य आहे असे अजिबात नाही. आजच्या तरूणाईचे आपले स्वतः चे काही ठोकताळे आहेत.त्यांनाही कांही नवं करण्याची आणि जग जिंकण्याची उर्मी आहे. तरूणाई हल्ली परिघाबाहेर पडून विचार करू लागली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न तरूणाईकडून होत आहे. यासंदर्भात कांही युवकांशी संवादसाधला असता त्यांनी मांडलेली मतं हेच अधोरेखीत करतात. आम्हीही बदल घडवू शकतो, आवश्यकता आहे ती केवळ आम्हाला समजून घेण्याची, असाच या तरूणाईचा सूर आहे. त्यांच्या बदलाच्या, परिवर्तनाच्या आणि विकासाच्या जशा वेगळ्या आहेत, तशीच त्यांची विचारसरणीदेखील जगाचा वेध घेत आहे. गाव-शहरे, प्रांत आणि देशांच्या पलिकडे जाऊन विचार करणारी ही पिढी जुन्या पिढीला बदफैली, असंवेदनशील वगैरे वाटत असली तरी चार भिंतीत त्यांना घुसमटायचं नाही. त्यांना विचार स्वातंत्र्य हवंय, त्यांना त्यांचे निर्णय स्वत:च घ्यायचे आहे. कारण, त्यांनी जागतिक बदलाचा अट्टाहास धरला आहे.
जागतिकीकरणात झालेले बदल त्यांना आपलेसे वाटायला लागले आहेत. कुटुंब व्यवस्थेच्या पलिकडे जाऊन हे विश्वची माझे घर असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. पण, हीच जमेची बाजू असू शकत नाही. कारण, संस्कृती जपण्याच्या नावाखाली पुन्हा जुन्या जळमटांच्या भावपाशात गुंतन पडणारी देखील हीच तरूणाई आहे. ज्यामुळे वैचारिक अध:पतनाच्या दिशेने ही वाटचाल सुरू असल्याचे दिसते. जात, धर्म, भाषा, संस्कृतीची सनातन परंपरा पुढे रेखाटतांना हीच तरूणाई जागतिकीकरणाच्या केवळ गप्पा तर मारत नाही ना? असा विषादपूर्ण प्रश्न मनाला चाटून जातो.
गरिब आणि श्रीमंत हीदेखील तरूणांच्या विचारांत, आचारांत भेद पाडणारी भिंत आहे. ही केवळ भिंत नाही ती बर्लिनची भिंत आहे. जी सगळ्याच बाबतीत तरूणाईला विभागत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वच पाळ्यावर द्वंद्व सुरू असल्याचे दिसते, जे भविष्यात देशात ‘गृहयुध्द’ घडवून आणायला पुरेसे आहे. त्यासाठीच राजकीय हस्तक्षेप टाळून स्वामी विवेकानंद सांगतात तसे आपले डोके आपल्याच मानेवर शाबूत ठेवण्यासाठी आपला समाज अभ्यासण्याची तीव्र गरज आज निर्माण झाली आहे. असो.. युवा दिनाच्या शुभेच्छा..!
- चेतन लक्केबैलकर, खानापूर
मतदानात चुरस, मतदानस्थळी मोठी गर्दी
खानापूर : येथील खानापूर को ऑप बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. दरम्यान, मतदारसह दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी समर्थ इंग्रजी शाळेसमोर मोठी गर्दी केली आहे. सहकार आणि बँक विकास अश्या दोन पॅनलमध्ये ही लढत होत आहे. गेल्या महिनाभरापासून बँकेच्या निवडणुकीचे रान पेटले आहे. विशेष म्हणजे शेलार विरुद्ध शेलार अशी ही रंगतदार लढत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर […]